Articles

‘मन की बात’ : प्रेरक प्रबोधनाची पन्नाशी Back

November 07, 2018

Originally Published In

शासक आणि शासित यांच्यात जी देवाण-घेवाण व्हायला हवी ती ‘मन की बात’मधून बऱ्यापैकी घडून येताना दिसते.

संवाद किंवा संप्रेषणशास्त्र आणि लोकव्यवहार या दोन्हीच्या समन्वयातून साकारणाऱ्या लोकसंवादाला सध्याच्या सार्वजनिक जीवनात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. व्यवस्थापनशास्त्रात ‘परस्पर संबंध’ किंवा ‘पारस्पारिकता’ हा घटक महत्त्वाचा ठरल्याची जाण जसजशी विकसित झाली तसतशा संवाद-जाणिवाही टोकदार होत गेल्या. विशेषत: राजकारणाच्या संदर्भात ज्याला ‘जन-जुडाव’ असे हिंदीत म्हटले जाते त्या जनतेशी नाते किंवा भावनिक संबंध निर्माण करण्याच्या प्रक्रियेत लोकसंवादाला मध्यवर्ती स्थान आहे हे नाकारता येणा नाही.

संवादात ‘सहभाग’ हा अंतर्निहितच असतो हे ओळखून अनेक लोकोत्तर नेत्यांनी लोकसंवादाची आपापली शैली विकसित केली. महात्मा गांधींनी सामूहिक भजनांचा चांगला उपयोग करून घेतला. ते स्वत:ही भजने गात. गांधी, पं. नेहरू इ. अनेकांनी पत्रव्यवहारावर खूप भर दिला. ‘तुम मुझे खून दो..’सारख्या घोषणांचा वापर करून नेताजींसारख्या अनेकांनी जनतेला एक अभिवचन दिले आणि अपेक्षाही व्यक्त केल्या. इंदिराजी प्रादेशिक शैलीत साडी नेसून नाते जोडण्याचा प्रयत्न करीत. आपल्याबरोबर ‘जय हिंद’चा त्रिवार घोष करायला लावून त्या लोकांना बरोबर घेत. अटलजी जिथे जात तिथल्या प्रादेशिक भाषेतील एक-दोन वाक्ये वापरून भाषेची भेदरेषा ओलंडत असत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आपल्या पूर्वसूरींच्या पावलावर पाऊल ठेवून लोकसंवाद साधताना दिसतात हे खरे असले तरी लोकसंवादाचे एक नवे उपकरण विकसित करून त्यांनी स्वत:चा एक नवा ठसाही उमटविला आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणारे त्यांचे भाषण, म्हणजे ‘मन की बात’ हे ते अभिनव उपकरण होय!

या रेडिओ कार्यक्रमाची संकल्पना खुद्द पंतप्रधानांचीच! २०१४च्या ऑगस्टमध्ये त्यांनी ‘कुछ हल्की-फुल्की मन की बातें’ लोकांबरोबर शेअर करण्यासाठी काय करता येईल? अशी चर्चा सहकाऱ्यांशी केली आणि त्यातूनच या मासिक रेडिओ-संवादाची रचना झाली. ३ ऑक्टोबर २०१४ या दसऱ्याच्या दिवशी पहिल्यांदा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारित झाला. पहिल्याच भाषणात त्यांनी ‘एक तरी वस्त्र खादीचे’ वापरण्याचे आवाहन केले. त्याला अक्षरश: भरभरून प्रतिसाद मिळून, २०१५-१६ या आर्थिक वर्षांत खादीच्या विक्रीत २९% वाढ झाली, त्यामागे या आवाहनाची महत्त्वाची भूमिका होती.

या रेडिओ कार्यक्रमाचे शीर्षक ‘मन की बात’ असले तरी वास्तवात ती ‘जन की बात’ आहे; कारण त्यातला किमान ६०% भाग लोकांच्या सूचनांवर आधारित आहे. आगामी ‘मन की बात’मध्ये मी काय बोलायला हवं, असा प्रश्न खुद्द पंतप्रधानच समाजमाध्यमांवरून विचारतात आणि लोक त्याला भरभरून प्रतिसाद देतात. त्यात सामान्य नागरिकांनी शेअर केलेले त्यांचे स्वत:चे अनुभव असतात, अनेक लपलेल्या ताऱ्यांच्या यशकथा असतात, एखाद्या कल्पकतापूर्ण प्रयोगाची माहिती असते, येऊ घातलेल्या उत्सवांची चर्चाही असते आणि अर्थातच कोणालाही भावेल; पटेल असे आवाहनही असते. या कार्यक्रमाची सहज-संवादी ठेवण जपण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी दोन प्रकारची पथ्ये कसोशीने पाळली आहेत. सरकारच्या कामगिरीचा प्रचार करण्यासाठी अथवा राजकीय स्वरूपाच्या चर्चेसाठी या व्यासपीठाचा उपयोग होता कामा नये ही ती दोन पथ्ये!

घराघरांतून जेवणाच्या टेबलांवर अथवा गावागावांतून पारावर बसलेल्या ग्रामस्थांमध्ये किंवा बायकांना एकत्र येण्याची संधी मिळाल्यावर त्यांच्या चर्चेत येणारे वा यायला हवेत असे अनेक विषय ‘मन की बात’मध्ये समाविष्ट होतात. त्यामुळेच आता उन्हाळ्याचे दिवस येतील तेव्हा कडक उन्हात डोक्यावर एखादा रुमाल वा उपरणं घेऊन शक्यतो बाहेर पडा, असा प्रेमाचा सल्ला देणारे पंतप्रधान, पालकांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनायला भाग पाडू नये अशी आग्रहाची विनवणी करतानाही दिसतात. स्त्री-भ्रूणहत्येच्या अपराधांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर कायदे करण्याबरोबरच समाज-मानस परिवर्तनही आवश्यक आहे. पंतप्रधानांनी हेच भान ठेवून ‘सेल्फी विथ डॉटर’चे आवाहन केले आणि मुलीच्या जन्मालाही साजरे करण्याचा संदेश अप्रत्यक्षपणे पोचविला!

सध्याच्या काळात विशेषत: टीन-एजर्सना मेंटर्स मिळत नाहीत. घराघरांतला संवादही क्षीण झाल्यासारखा, त्यामुळे वडीलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शन केले जाणे आणि ते घरातल्या नवतरुणांकडून स्वीकारले जाणे, हे दोन्ही सहजसाध्य नाही. याच्या नानाविध परिणामांपैकी एक म्हणजे अनेक ठिकाणी आढळणारी प्रेरणा आणि प्रोत्साहनाची वानवा! बहुधा हे ओळखूनच पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये धडपडणाऱ्या तरुणांच्या अनेक यशकथा संवादात  गुंफल्याची डझनवारी उदाहरणे आहेत. सीमेवर लढणारे सैनिक, शहरातून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणारे पोलीस, अंगणवाडी सेविका आणि ‘आशा’ कार्यकर्त्यां, अशा ज्यांच्या नित्य कर्तव्यपरायणतेची पुरेशी दखल घेतली जात नाही. घटकांमधील काही कर्तव्यनिष्ठ व्यक्तींना जाहीर शाबासकी देण्यासाठीही ‘मन की बात’चे माध्यम पंतप्रधान मोदींनी मुबलकपणे वापरले आहे.  महाराष्ट्रात जुन्नरच्या म्हेत्रे परिवाराने घरच्या कार्यात पाहुण्यांना कपडालत्ता व श्रीफळ देण्याच्या परंपरेला फाटा देऊन सर्वाना पेरूच्या झाडाचे एकेक रोप दिल्याचे उदाहरणही ‘मन की बात’मुळेच चर्चा विषय बनले. अफ्रोज शाह या मुंबईकर नागरिकाच्या पुढाकाराने हाती घेतले गेलेले वसरेवा बीच स्वच्छतेचे अभियान, कानपूरच्या जवळ बेरी दरियावन गावातील एका ग्रामस्थाने सुमारे दोन वर्षांपूर्वी विजेविना अंधारात असलेल्या या गावातील ग्रामस्थांना सोलर दिवे भाडय़ाने देण्याचा सुरू केलेला उपक्रम, हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांनी सुरू केलेले ग्रामविकासाचे विविध प्रकल्प, इ. अनेक प्रेरक आणि उद्बोधक कहाण्या या ‘मन की बात’मुळेच ‘जन की बात’ होऊ शकल्या!

‘विकास’ हा सरकारचाच केवळ नव्हे तर जनतेचा अजेंडा असायला हवा आणि तसा तो झाला तर विकास हीदेखील एक लोकचळवळ होऊ शकते ही आपली भूमिका मोदींनी अनेक वेळा, अनेक व्यासपीठांवरून मांडली आहे. त्यामुळेच हिमाचल प्रदेशातील बधाना गावचा ग्रामस्थ असलेल्या आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांत काम करणाऱ्या विकास ठाकूर या जवानाने आपल्या बचतीतून पैसे साठवून ५७ हजाराचा चेक सरपंचाला दिला आणि शौचालये घरात नसलेल्या ५७ गावकऱ्यांनी त्यातून शौचालये बांधली, गाव हागणदरीमुक्त केले; हे सर्व ‘मन की बात’ मध्ये कौतुकाने सांगितले जाते.

प्रेरणेच्या बरोबरीने व्यापक सामाजिक प्रबोधनाचे विषयही ‘मन की बात’ने प्रभावीपणे हाताळले आहेत. मादक पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम (डिसेंबर २०१४), रस्ते वाहतुकीत सुरक्षेसाठी नियम पालनाची गरज (जुलै २०१५), अवयव दान ही चळवळ होण्याची आवश्यकता (ऑक्टोबर १५) असे काही विषय ही या संदर्भातली उल्लेखनीय उदाहरणे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत-भेटीवर आले असताना त्यांच्या उपस्थितीचे औचित्य साधून त्यांच्यासह संयुक्त ‘मन की बात’ करण्याची अभिनव कल्पनाही या उपक्रमाच्या एकूणच नावीन्यपूर्णतेत भर घालणारी ठरली.

दोन वर्षांपूर्वी, डिसेंबर २०१६ मध्ये आकाशवाणीच्या पाहणीत आढळल्यानुसार सुमारे २७ कोटी श्रोते ‘मन की बात’ बऱ्यापैकी नियमितपणे ऐकतात. १५ वर्षे वयावरील भारतीयांपैकी सुमारे २०% लोकांनी ‘मन की बात’ची सर्व प्रसारणे ऐकली आहेत तर ५०% लोकांनी निदान एकदा तरी ‘मन की बात’ ऐकली आहे. ‘मन की बात’ला मिळणाऱ्या या उदंड प्रतिसादाचे मूळ त्याच्या सहज-संवादी शैलीत आहे, महितीपूर्णतेत आहे आणि भावनिक आवाहनातही आहे. शिंझो आबे, आँग सान सू की, आणि बिल गेट्ससारख्या नामवंतांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे, अनेकांनी त्यावर संशोधन-प्रकल्प हाती घेतले आहेत.

नरेंद्र मोदींच्या आधीच्या सर्व पंतप्रधानांचा थेट लोकसंवाद हा मुख्यत्वे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने होत असे. या रूढ पद्धतीला बाजूला सारून पंतप्रधान दरमहा लोकांशी बोलू लागल्याने जनताही अनेक सूचना पाठवू लागल्याची अनंत उदाहरणे आहेत. यात संस्कृत शिकण्यासाठी ऑनलाइन पाठय़क्रमाच्या गरजेपासून ते सुगम्य भारत अभियानात आणखी काय करता येईल, याबाबतच्या उपयुक्त सूचनांपर्यंत अनेक विषयांचा समावेश आहे. सूचना करणाऱ्यांपैकी सुमारे ३०% श्रोते पत्र वा मेल पाठवितात, १५% टोल फ्री फोनचा वापर करतात तर उर्वरित माय-गव्ह या पोर्टलद्वारे अथवा ‘नमो’ अ‍ॅपच्या माध्यमातून अभिप्राय पोहोचविताना आढळतात.

देशाच्या सर्वंकष प्रगतीशी संबंधित समाज-मानस परिवर्तन आणि प्रेरणा-जागरण यासाठी शासकतेच्या विषयांच्या अनुषंगाने शासक आणि शासित यांच्यात जी देवाण-घेवाण व्हायला हवी ती ‘मन की बात’मधून बऱ्यापैकी घडून येताना दिसते. या मालिकेतील ५० वे प्रसारण येत्या २५ नोव्हेंबरला घडून येत असताना शासकता-संप्रेषण (गव्हर्नन्स कम्युनिकेशन) विषयाच्या संदर्भात या उपक्रमाची दखल घेतली जायला हवी, ती यासाठीच.